Friday, June 4, 2010

वाजले की बारा

काही वर्षांपूर्वी एक चिनी चित्रपट पहिला होता. त्यातील वयस्क जोडपे घटस्फोट घेते, सगळे बरे चाललेले असूनही. का? तर त्यांना सरकारी कोट्यातून घर हवे असते; आणि घटस्फोटीत महिलांना प्राधान्य देण्याचे सरकारी धोरण असते.
 
बातमीदार वरचा लेटेस्ट लेख वाचून याची आठवण झाली. (विषय: मुख्यमंत्र्यांनी कलाकारांच्या कोट्यातून घर वाटप करताना काही जणांवर व जणींवर केलेली कथित  मेहेरनजर. आणि यासंबंधातील सकाळची एकस्ळूझीव बातमी.) बापू अत्रंगे यांच्या म्हणण्यानुसार मागे एका  पत्रकार जोडप्याने घटस्फोट घेऊन दोन सरकारी घरे मिळवली -- शेजारी-शेजारी -- आणि ते परत एकत्र नांदू लागले! 
 
असो.
 
सकाळच्या बातमीनुसार, सोनाली कुलकर्णी उर्फ नटरंग मधील अप्सरा हिसही या प्रकारात घर मिळाले. यावरून सुचवला  गेलेला एक मथळा:  "अप्सरेला घर देताना, नियमांचे वाजले की बारा!"
 
दुर्दैवाने हा मथळा अमान्य झाला.
 
   

Wednesday, June 2, 2010

पहिला पाउस

जेव्हा पहिला पाउस पडू लागला,
(तब्बल आठ महिन्यांनंतर) 
आणि मुले कालवा (पक्षी: आनंद-जन्य आरडा-ओरडा ) करू लागली,
तेव्हा,

शेजारील अनधिकृत घरातील अधिकृत मांजर मला म्हणाली:

पावसाळा सुरु झाला म्हणजे वैतागच आहे च्यायला!
(माझ्याप्रमाणेच तीही  वरील ओळीतील शेवटचा शब्द अशिष्ट मानीत नाही.)

न भिजता फिरायचे छपरावरून  वगैरे  म्हणजे अवघडच आहे.
शिवाय, आता त्या असंस्कृत माणसाळलेल्या  कुत्र्यांचा काळवेळ न बघता
 भर रस्त्यावर आचरटपणाही चालू होईल
 (म्हणजे आपण डोळेच मिटून घ्यावेत हे बरे.)


तेव्हा, मी म्हणालो, असे कसे? उकाडा केव्हढा होतो आहे, तो आता कमी होईल.

तेव्हा, ती म्हणाली, 
उकाडा कसला आलाय? आणि मग कपडे कशाला घालावेत उगाच?   

ता.क. - वाक्ये सरळ न लिहिता अधेमधे तोडली की कविता होते हे आमचे ज्येष्ठ फेलो ब्लोगर विसोबा खेचर यांचे जुने मत आम्ही आमच्या बचावार्थ येथे उधृत करू इच्छितो.  

तथास्तु!

लोक्प्रभाचा अंक ऑन-लायनीवर आल्यावर मी प्रथम आनंद जोहरी यांच्या सदरावर क्लिक करतो. तथास्तु या जोहरी-कृत सदराचाशोध मला तसा फार उशिरा लागला. त्यापूर्वी मी `फुल्या फुल्या डॉट कॉम' (कोण लिहितो माहित नाही, पण प्रवीण टोकेकर त्याची नक्कल करून पूर्वी सकाळ मध्ये लिहित.), तथ्यांश (हे संपादकीय असते, पण कालातीत! चालू घडामोडींशी काही एक संबंध नसतो.), मेतकुट, वगैरे वाचत असे. तथास्तु वाचत नव्हतो याचा भयंकर खेद हे सदर प्रथम वाचल्यावर झाला. कुठे ते टोकेकर, कणेकर, `साहेब', यांचे थिल्लर लिखाण, व कुठे जोरींची गुरुवाणी!

मोक्ष-प्राप्तीसाठी आत्मज्ञान होणे ही पाहिली पायरी असते असे भगवंतानी सांगितले आहे. (मी साम चानेल पाहत नाही. हे सूत्रवचन दुसरीकडे कुठे ऐकलेले आहे.) जोहरी यांचे सदर वाचेपर्यंत माझे आत्मज्ञान कमालीचे सीमित होते हे कबुल केले पाहिजे. मला गणित आवडत नाही, कटरीना कैफ आवडते, मी सलमान खानहून दिसायला भारी आहे (पण तो कुमारी कटरीनास माझ्याआधी भेटला व घोटाळा झाला.), ईत्पत आत्मज्ञान मला होते.
तथास्तु वाचल्यावर मला माझा शुभांक पाच आहे ( २३ = २ + ३ = ५) हे कळले. "मी मनमिळावू असून माझा स्वभाव महत्वाकांक्षी आहे. माझ्या गुणवत्तेची कल्पना बाकीच्यांना चटकन येत नसल्यामुळे माझ्या लायकीप्रमाणे यश मला मिळत नाही. मला पिवळा रंग धार्जिणा असून मी प्रवाळ रत्न धारण करावे व बुधवारी उपास करून शनीला फुले वाहावीत" हे तथास्तु वाचेपर्यंत माहित नव्हते. आपण आयुष्याची तब्बल तीन दशके या ज्ञानावाचून काढली हे लक्षात येऊन अतिशय वाईट वाटले. परंतु सर्वच गोष्टींना ( उदा: कुमारी कटरीना कैफची वेळेवर गाठ पडणे) योग यावा लागतो हेच खरे.

परंतु जोहरी यांचे `मिशन' लोकप्रभेच्या वाचकांना केवळ आत्मज्ञान करून देणे एवढे मर्यादित नाही. ते ईतरही ज्ञान -- जे मोक्षप्राप्ती होईपर्यंत या व्यावहारिक जगात कामास येते -- तथास्तुच्या माध्यमातून वाटतात. आता या आठवड्यातील विषयच पहा. जोहरी म्हणतात:

आनंदाच्या प्रसंगी, शुभ प्रसंगी आपण अनेकजणांकडून भेटवस्तू देत किंवा घेत असतो. आणि आपले संबंध आणखीन मजबूत बनवत असतो.

पण सावधान! तुम्हाला माहीत आहे का या भेटवस्तू जसा आनंद निर्माण करतात तसेच हानिकारकही ठरू शकतात.

संख्या शास्त्रानुसार
जेव्हा आपल्याला आपल्या मित्र ग्रहांच्या वस्तू भेट मिळतात तेव्हा आपल्यावर मित्र ग्रहांची कृपा कायम राहाते. परंतु जेव्हा


आपण आपल्या मित्र ग्रहांच्या वस्तू इतरांना देतो तेव्हा आपण आपले सौभाग्य कमी करतो. त्यामुळे आपली

सकारात्मक ऊर्जा खर्च होते. यामुळेच कालांतराने आपले यश पैसा कमीकमी होत जातो जसे की सद्दाम हुसैन,

रामलिंगम राजू इत्यादी.


सगळाच लेख येथे चिकटवायला (कॉपी-पेस्ट) आवडले असते, परंतु ते ज्ञान-चौर्य होईल. पण लेखाच्या शेवटी जोहरी जे म्हणतात ते उधृत करण्याचा मोह आवरत नाही:

शक्यतो शत्रुग्रहांच्या वस्तू भेट घेण्याचे आणि मित्रग्रहांच्या वस्तू भेट देण्याचे टाळावेच. तुमच्या कुंडलीतील उच्च ग्रहांच्या वस्तू भेट देण्याने तुमचे भाग्य कमी

होते म्हणूनच याचे विशेष ध्यान ठेवा....

... भेट द्यायचे सगळ्यात उत्तम माध्यम आहे पैसे. रुपया. वस्तू देण्याघेण्यापेक्षा पैसे देणे घेणे कधीही उत्तम आणि सुरक्षित ठरते.


असो. असे अत्यंत समाज-उपयोगी सदर चालवल्याबद्दल पुरोगामी लोकप्रभेच्या संपादकांचे कौतुक केले पाहिजे. (पुरोगामिनंतर फुले-शाहू-आंबेडकरांच्या असे लिहिणार होतो, पण कीपॅड चावले. फुले-शाहू-आंबेडकरांचा तो महाराष्ट्र. लोकप्रभा गोयन्कांची.) तथास्तु!

"टिळक सुटले"

टिळकांची मंडालेच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यावर तात्यासाहेब केळकरांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला. `लोकमान्य टिळकांची बंधमुक्तता'. टिळकांनी त्यावर एक नजर फिरवली आणि म्हणाले: "बाकी ठीक आहे, पण शीर्षक तेवढे बदला."

"काय शीर्षक द्यायचं?"

"टिळक सुटले."

(दुर्दम्य, गंगाधर गाडगीळ)

मागच्या बाकावरचे मराठी

कुरकुरेच्या स्लोगनचे मराठी रुपांतर (टीव्ही वर ऐकले):

वाकडा आहे, पण माझा आहे.

प्रभो, भाषांतर करणार्याला/ करणारीला क्षमा कर.
यांना मराठी येत नाही.
किंवा फक्त वर्गात बाई शिकवत तेवढेच येते.
मागच्या बाकांवर जे मराठी बोलले जाते ते येत नाही!

मेक्स नो डि फ रन्स.

साहित्य संमेलनाला मी आजपर्यंत कधी गेलेलो नाही. कोणी कधी बोलावले तर(च) जाईन. पण मी पुण्याचा असल्याने, तत्कारणे मत व्यक्त करण्याचा हक्क पाळण्यातच प्राप्त झालेला
झालेला असल्याने, द्याट मेक्स नो डि फ रन्स.

१. दरवर्षी संमेलन घेण्याचा सोस कशाला? ठाले-पाटील व त्यांच्या जमातीतील इतरांना वर्षभर इतर काही उद्योग नसतो म्हणून? ऑलीम्पिक कुठे दरवर्षी होते? साहित्य संमेलन दर चार वर्षांनी भरवावे असे कुसुमाग्रज कधी काळी म्हणाले होते. माझेही तेच मत आहे. (महान मनुष्ये एकसमान विचार करतात या आंग्ल वाचनाची आठवण काहीजणांना येथे होईल.) चार वर्षांनी संमेलन घेण्याचा एक मोठा फायदा हा कि अध्यक्षही चारच वर्षांनी शोधावा लागेल. मराठीतील साहित्यिक म्हणावे अशी मंडळी पट्टेरी वाघांप्रमाणेच झपाट्याने नष्ट होत आहेत. दरवर्षी नवा अध्यक्ष कुठून आणावा? अलीकडेच विंदा नावाचा वाघ बांद्र्यात मृत्युमुखी पडला. आता बांद्र्यात उरलेत ते कागदी वाघ.

२. संमेलनात मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री, इत्यादींचे मंचावर काय काम? त्यांना प्रेक्षकात बसवावे. म्हणजे ते आपसूक यायचे बंद होतील.

३. संमेलन सरकारी पैशांवर का म्हणून भरवायचे? संमेलन हा हौशीचा मामला आहे. एक फंड गोळा करावा; सामान्य जनांना जर काही सोयरसुतक असेल तर पैसे जमतील. नसेल, तर संमेलन भरवण्यात काही पाईंट नाही. मराठी भाषेच्या नावाने अंघोळ करून मोकळे व्हावे.

आठवते का?

`आठवते का' या शीर्षकाची एक कविता मी शाळेत असताना सहावीच्या मराठीच्या पुस्तकात होती. ती मी पाचवीच्या वर्गात ऐकली आणि तिच्या प्रेमात पडलो. त्यावेळेला मी कोकणातल्या एका खेडेगावात रहात होतो. शाळेत मुलांनी मराठीच्या तासाला शिक्षक वर्गात येण्याआधी कविता म्हणायची पद्धत होती, व सहावीचा वर्ग शेजारीच होता.

आठ -- वते का.... हेच कवितेचे धृवपद होते. ज्या चालीवर ती सहावीची मुले म्हणत ती चाल फार सोपी होती -- चाळीस-एक मुलांना बेसूर न होता खड्या आवाजात म्हणता येईल, तेही समोर शिक्षक नसताना, इतकी सोपी -- पण बाळबोध नव्हती. जे काही जेमतेम सूर त्यात होते त्यांनी मला पछाडून टाकले. इतके, की ही कविता म्हणता येईल म्हणून मी सहावीत जाण्याची वाट पहात होतो.

दुर्दैवाने मी सहावीत गेलो आणि वडलांची बदली झाल्याने आम्ही पुण्याला आलो. पुण्याच्या शाळेत कविता अशी म्हणण्याची पद्धत नव्हती.

मला आता या कवितेची एक ओळही आठवत नाही. `करवंदीच्या जाळीमधुनी' एवढा एका ओळीचा तुकडा आठवतो. कवी आपल्या लहानपणीच्या सोबत्याला `आपण तेव्हा कसे उनाडत असू' हे आठवते का असे विचारतोय ही कवितेची थीम. अगदी सहजगत्या इंग्रजीत ज्याला `नॉस्टेलजिया' म्हणतात तो भाव जागृत करण्याची ताकद कवितेमध्ये आणि त्या चालीमध्ये होती.

मला बोंबलायला कवीचे नावही आठवत नाही -- जुन्या काळातले, फारसे ना गाजलेले कोणीतरी कवी होते. (आणि कोकणातलेच असणार: करवंदीच्या जाळ्या बाकी कुठे आहेत?) बालभारतीची मराठीची पाठ्य-पुस्तके -- कमीत कमी पाचवी ते नववी दरम्यानचीतरी -- जपून ठेवायला हवी होती. ती पुस्तके आता दुकानात मिळणे शक्य नाही, कारण मी दहावी झाल्यानंतर किमान दोन वेळा तरी अभ्यासक्रम बदलला असणार.

कोणाला आठवते का ही कविता?