लोक्प्रभाचा अंक ऑन-लायनीवर आल्यावर मी प्रथम आनंद जोहरी यांच्या सदरावर क्लिक करतो. तथास्तु या जोहरी-कृत सदराचाशोध मला तसा फार उशिरा लागला. त्यापूर्वी मी `फुल्या फुल्या डॉट कॉम' (कोण लिहितो माहित नाही, पण प्रवीण टोकेकर त्याची नक्कल करून पूर्वी सकाळ मध्ये लिहित.), तथ्यांश (हे संपादकीय असते, पण कालातीत! चालू घडामोडींशी काही एक संबंध नसतो.), मेतकुट, वगैरे वाचत असे. तथास्तु वाचत नव्हतो याचा भयंकर खेद हे सदर प्रथम वाचल्यावर झाला. कुठे ते टोकेकर, कणेकर, `साहेब', यांचे थिल्लर लिखाण, व कुठे जोरींची गुरुवाणी!
मोक्ष-प्राप्तीसाठी आत्मज्ञान होणे ही पाहिली पायरी असते असे भगवंतानी सांगितले आहे. (मी साम चानेल पाहत नाही. हे सूत्रवचन दुसरीकडे कुठे ऐकलेले आहे.) जोहरी यांचे सदर वाचेपर्यंत माझे आत्मज्ञान कमालीचे सीमित होते हे कबुल केले पाहिजे. मला गणित आवडत नाही, कटरीना कैफ आवडते, मी सलमान खानहून दिसायला भारी आहे (पण तो कुमारी कटरीनास माझ्याआधी भेटला व घोटाळा झाला.), ईत्पत आत्मज्ञान मला होते.
तथास्तु वाचल्यावर मला माझा शुभांक पाच आहे ( २३ = २ + ३ = ५) हे कळले. "मी मनमिळावू असून माझा स्वभाव महत्वाकांक्षी आहे. माझ्या गुणवत्तेची कल्पना बाकीच्यांना चटकन येत नसल्यामुळे माझ्या लायकीप्रमाणे यश मला मिळत नाही. मला पिवळा रंग धार्जिणा असून मी प्रवाळ रत्न धारण करावे व बुधवारी उपास करून शनीला फुले वाहावीत" हे तथास्तु वाचेपर्यंत माहित नव्हते. आपण आयुष्याची तब्बल तीन दशके या ज्ञानावाचून काढली हे लक्षात येऊन अतिशय वाईट वाटले. परंतु सर्वच गोष्टींना ( उदा: कुमारी कटरीना कैफची वेळेवर गाठ पडणे) योग यावा लागतो हेच खरे.
परंतु जोहरी यांचे `मिशन' लोकप्रभेच्या वाचकांना केवळ आत्मज्ञान करून देणे एवढे मर्यादित नाही. ते ईतरही ज्ञान -- जे मोक्षप्राप्ती होईपर्यंत या व्यावहारिक जगात कामास येते -- तथास्तुच्या माध्यमातून वाटतात. आता या आठवड्यातील विषयच पहा. जोहरी म्हणतात:
आनंदाच्या प्रसंगी, शुभ प्रसंगी आपण अनेकजणांकडून भेटवस्तू देत किंवा घेत असतो. आणि आपले संबंध आणखीन मजबूत बनवत असतो.
पण सावधान! तुम्हाला माहीत आहे का या भेटवस्तू जसा आनंद निर्माण करतात तसेच हानिकारकही ठरू शकतात.
संख्या शास्त्रानुसार
जेव्हा आपल्याला आपल्या मित्र ग्रहांच्या वस्तू भेट मिळतात तेव्हा आपल्यावर मित्र ग्रहांची कृपा कायम राहाते. परंतु जेव्हा
आपण आपल्या मित्र ग्रहांच्या वस्तू इतरांना देतो तेव्हा आपण आपले सौभाग्य कमी करतो. त्यामुळे आपली
सकारात्मक ऊर्जा खर्च होते. यामुळेच कालांतराने आपले यश पैसा कमीकमी होत जातो जसे की सद्दाम हुसैन,
रामलिंगम राजू इत्यादी.
सगळाच लेख येथे चिकटवायला (कॉपी-पेस्ट) आवडले असते, परंतु ते ज्ञान-चौर्य होईल. पण लेखाच्या शेवटी जोहरी जे म्हणतात ते उधृत करण्याचा मोह आवरत नाही:
शक्यतो शत्रुग्रहांच्या वस्तू भेट घेण्याचे आणि मित्रग्रहांच्या वस्तू भेट देण्याचे टाळावेच. तुमच्या कुंडलीतील उच्च ग्रहांच्या वस्तू भेट देण्याने तुमचे भाग्य कमी
होते म्हणूनच याचे विशेष ध्यान ठेवा....
... भेट द्यायचे सगळ्यात उत्तम माध्यम आहे पैसे. रुपया. वस्तू देण्याघेण्यापेक्षा पैसे देणे घेणे कधीही उत्तम आणि सुरक्षित ठरते.
असो. असे अत्यंत समाज-उपयोगी सदर चालवल्याबद्दल पुरोगामी लोकप्रभेच्या संपादकांचे कौतुक केले पाहिजे. (पुरोगामिनंतर फुले-शाहू-आंबेडकरांच्या असे लिहिणार होतो, पण कीपॅड चावले. फुले-शाहू-आंबेडकरांचा तो महाराष्ट्र. लोकप्रभा गोयन्कांची.) तथास्तु!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment