साहित्य संमेलनाला मी आजपर्यंत कधी गेलेलो नाही. कोणी कधी बोलावले तर(च) जाईन. पण मी पुण्याचा असल्याने, तत्कारणे मत व्यक्त करण्याचा हक्क पाळण्यातच प्राप्त झालेला
झालेला असल्याने, द्याट मेक्स नो डि फ रन्स.
१. दरवर्षी संमेलन घेण्याचा सोस कशाला? ठाले-पाटील व त्यांच्या जमातीतील इतरांना वर्षभर इतर काही उद्योग नसतो म्हणून? ऑलीम्पिक कुठे दरवर्षी होते? साहित्य संमेलन दर चार वर्षांनी भरवावे असे कुसुमाग्रज कधी काळी म्हणाले होते. माझेही तेच मत आहे. (महान मनुष्ये एकसमान विचार करतात या आंग्ल वाचनाची आठवण काहीजणांना येथे होईल.) चार वर्षांनी संमेलन घेण्याचा एक मोठा फायदा हा कि अध्यक्षही चारच वर्षांनी शोधावा लागेल. मराठीतील साहित्यिक म्हणावे अशी मंडळी पट्टेरी वाघांप्रमाणेच झपाट्याने नष्ट होत आहेत. दरवर्षी नवा अध्यक्ष कुठून आणावा? अलीकडेच विंदा नावाचा वाघ बांद्र्यात मृत्युमुखी पडला. आता बांद्र्यात उरलेत ते कागदी वाघ.
२. संमेलनात मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री, इत्यादींचे मंचावर काय काम? त्यांना प्रेक्षकात बसवावे. म्हणजे ते आपसूक यायचे बंद होतील.
३. संमेलन सरकारी पैशांवर का म्हणून भरवायचे? संमेलन हा हौशीचा मामला आहे. एक फंड गोळा करावा; सामान्य जनांना जर काही सोयरसुतक असेल तर पैसे जमतील. नसेल, तर संमेलन भरवण्यात काही पाईंट नाही. मराठी भाषेच्या नावाने अंघोळ करून मोकळे व्हावे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment