Wednesday, June 2, 2010

आठवते का?

`आठवते का' या शीर्षकाची एक कविता मी शाळेत असताना सहावीच्या मराठीच्या पुस्तकात होती. ती मी पाचवीच्या वर्गात ऐकली आणि तिच्या प्रेमात पडलो. त्यावेळेला मी कोकणातल्या एका खेडेगावात रहात होतो. शाळेत मुलांनी मराठीच्या तासाला शिक्षक वर्गात येण्याआधी कविता म्हणायची पद्धत होती, व सहावीचा वर्ग शेजारीच होता.

आठ -- वते का.... हेच कवितेचे धृवपद होते. ज्या चालीवर ती सहावीची मुले म्हणत ती चाल फार सोपी होती -- चाळीस-एक मुलांना बेसूर न होता खड्या आवाजात म्हणता येईल, तेही समोर शिक्षक नसताना, इतकी सोपी -- पण बाळबोध नव्हती. जे काही जेमतेम सूर त्यात होते त्यांनी मला पछाडून टाकले. इतके, की ही कविता म्हणता येईल म्हणून मी सहावीत जाण्याची वाट पहात होतो.

दुर्दैवाने मी सहावीत गेलो आणि वडलांची बदली झाल्याने आम्ही पुण्याला आलो. पुण्याच्या शाळेत कविता अशी म्हणण्याची पद्धत नव्हती.

मला आता या कवितेची एक ओळही आठवत नाही. `करवंदीच्या जाळीमधुनी' एवढा एका ओळीचा तुकडा आठवतो. कवी आपल्या लहानपणीच्या सोबत्याला `आपण तेव्हा कसे उनाडत असू' हे आठवते का असे विचारतोय ही कवितेची थीम. अगदी सहजगत्या इंग्रजीत ज्याला `नॉस्टेलजिया' म्हणतात तो भाव जागृत करण्याची ताकद कवितेमध्ये आणि त्या चालीमध्ये होती.

मला बोंबलायला कवीचे नावही आठवत नाही -- जुन्या काळातले, फारसे ना गाजलेले कोणीतरी कवी होते. (आणि कोकणातलेच असणार: करवंदीच्या जाळ्या बाकी कुठे आहेत?) बालभारतीची मराठीची पाठ्य-पुस्तके -- कमीत कमी पाचवी ते नववी दरम्यानचीतरी -- जपून ठेवायला हवी होती. ती पुस्तके आता दुकानात मिळणे शक्य नाही, कारण मी दहावी झाल्यानंतर किमान दोन वेळा तरी अभ्यासक्रम बदलला असणार.

कोणाला आठवते का ही कविता?

No comments: