Wednesday, June 2, 2010

पहिला पाउस

जेव्हा पहिला पाउस पडू लागला,
(तब्बल आठ महिन्यांनंतर) 
आणि मुले कालवा (पक्षी: आनंद-जन्य आरडा-ओरडा ) करू लागली,
तेव्हा,

शेजारील अनधिकृत घरातील अधिकृत मांजर मला म्हणाली:

पावसाळा सुरु झाला म्हणजे वैतागच आहे च्यायला!
(माझ्याप्रमाणेच तीही  वरील ओळीतील शेवटचा शब्द अशिष्ट मानीत नाही.)

न भिजता फिरायचे छपरावरून  वगैरे  म्हणजे अवघडच आहे.
शिवाय, आता त्या असंस्कृत माणसाळलेल्या  कुत्र्यांचा काळवेळ न बघता
 भर रस्त्यावर आचरटपणाही चालू होईल
 (म्हणजे आपण डोळेच मिटून घ्यावेत हे बरे.)


तेव्हा, मी म्हणालो, असे कसे? उकाडा केव्हढा होतो आहे, तो आता कमी होईल.

तेव्हा, ती म्हणाली, 
उकाडा कसला आलाय? आणि मग कपडे कशाला घालावेत उगाच?   

ता.क. - वाक्ये सरळ न लिहिता अधेमधे तोडली की कविता होते हे आमचे ज्येष्ठ फेलो ब्लोगर विसोबा खेचर यांचे जुने मत आम्ही आमच्या बचावार्थ येथे उधृत करू इच्छितो.