Wednesday, June 2, 2010

पुनर्भेट

कादंबरीकार, विशेषतः आधुनिक काळातले, स्वतःच्या अनुभवांचा आणि निरीक्षणांचा कच्चा माल म्हणून सढळ हाताने वापर करतात. आणि कादंबरीकारांविषयी इतरत्र मिळणाऱ्या माहितीतून काहीवेळा याचा सुगावा लागतो.
फार वर्षांपूर्वी मी व्यंकटेश माडगुळकरांचे पांढऱ्यावर काळे हे पुस्तक वाचले. माडगुळकरांनी त्यात एका आडगावी राहणाऱ्या लेखकमित्राच्या घरी जाण्याची हकीगत सांगितली आहे. लेखकाचे नाव न देता. गोडसे भटजींचे प्रवास वर्णन, स्मृतिचित्रे, आणि दोन चार आणखी पुस्तके वगळता मराठीत नाव घेण्यासारखे साहित्य नाही, असे मित्र म्हणतात. माडगुळकर त्यावर म्हणतात: म्हणजे आम्ही फुकटच लिहितो म्हणाकी! मित्र त्यावर म्हणतात, माडगुळकर, तुम्ही माणदेशी माणसे लिहून मरून जायला पाहिजे होते, लेखक म्हणून!
याच लेखात, मित्राच्या मोरीतील कोळ्याच्या जाळ्याचा उल्लेख येतो. मित्र सांगतात: पाणी जपून फेका, तिथे आमच्या मित्राचे जाळे आहे, ते तुटेल. मी त्याला कधी कधी मेलेली माशी खायला घालतो, पण त्याला मुर्दाड मांस चालत नाही, ई. ई.
आणि आज भालचंद्र नेमाड्यांचे जरीला वाचताना हा मोरीतला कोळी भेटला! चांगदेव हा जरीलाचा नायक. त्याच्या भाड्याच्या घरातील मोरीत हा कोळी जाळे बांधतो. जाळ्याचे एक टोक मोरी घासायच्या ब्रशला टांगतो, आणि जाळे तुटू नये म्हणून चांगदेव मोरी घासणे बंद करतो!
माडगुळकरांना भेटलेला कोळी तो हाच.
इतक्या वर्षांनी कोळ्याला दुसर्या पुस्तकात भेटून मलाही आनंद झाला. जरीला झकास कादंबरी आहे, तेव्हा कोळी अमर राहील.

No comments: